Thursday, 30 January 2014

बाल्य

मुले म्हणजे देवाघरची फुले
हे कळले आहे मला,
तुम्हाला, आम्हाला पण
घडविण्याचा अभिमान
वृथाच का ? हे न मला
कळे 

त्या फुलांना गंध आहे 
दर्प नाही, तो सुवास 
निर्मलतेचा,पावित्र्याचा
अबोधतेचा, अनघ पावन 
असण्याचा

का शिकविता त्यांना 
वेद,बायबल,पुराण?
का घोटून घेतो आपण
झेंड अवेस्ता ,धम्म ,कुराण

अंगाई गीत ऐकताना 
तो मंद मंद हसतो
कारण शब्द नाही तो तर
मधुर संगीत ऐकत असतो

त्या चालीला धर्म नाही
माया स्त्रवत असते 
ऊबेचा तो खरा अर्थ 
फ़क्त त्यालाच कळत असतो

कारण त्याला भाषा नाही
प्रेम जाणवत असते 
इतर सर्व व्यर्थ आहे 
हे त्याला ठाऊक असते

अजूनही मौनातले ज्ञान
त्याला उमगत असते 
स्नेहासाठी भाषा नाही
भावना पुरेशी असते

ऑफीसमधून दमलेल्या बाबांचे
तो हसून स्वागत करतो
ते निर्वाज्य सुख अनुभवताच
बाबा मोठा होतो

असमर्थ तो बोलावयास
पण सामर्थ्य त्यातच असते 
कारण शैशव हेच सुन्दर खरे
त्यानेच अधोरेखित केले असते

मोठा होऊन उद्या तो
शिकेल नवी भाषा
ती फ़क्त माणुसकीची असेल
हीच माझी आशा